कारंजा : बरेच वेळा क्षुल्लक भानगडींना "दारू' कारणीभूत असल्याचेच निष्पन्न झालेले आहे. आणि त्यामुळेच स्थानिक प्रशासनाने, दारुड्यांना अवैध दारू कोठेही उपलब्ध होणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाचे व्यसनमुक्ती प्रचारक असलेले, महाराष्ट्र शासन राज्यस्तरिय राष्ट्रपिता व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, सध्या कोव्हीड 19 कोरोना महामारीचा भयंकर काळ मागे पडल्यामुळे सर्वधर्मिय सण त्यौहार उत्सव यात्रेचा आनंद नागरिक घेत आहेत. अशातच सध्या श्री गणेशोत्सव सुरू असून, भाद्रपद अनंतचतुर्दशी, शुक्रवार दि.९ सप्टेंबर रोजी श्री गणेशोत्सव विसर्जन असल्यामुळे, नगरपरिक्रमेसह विसर्जन मार्गावरून बाप्पांची, भव्य मिरवणुक निघणार आहे. सदरहु मिरवणुक दरवर्षी शहरातील, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (नेहरू चौक), दिल्ली वेशीजवळ, (इंदिरा गांधी चौक) आणि राजधानी फोटो स्टुडिओ जवळ (बजरंग पेठ) येथे लेझिम पथके जास्त काळ रमत असतात. आणि या चौकांमध्ये दारुड्या व्यक्तिंचा त्रास होत असल्याचे सुद्धा बरेच वेळेला दृष्टिस पडत असते त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दारुड्या लोकांचा मिरवणुकीला व्यत्यय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच विसर्जनाचे दिवशी देशी दारू दुकाने बंद असल्यानंतरही यांना उपलब्ध होतेच कशी ? हे बघणे सुद्धा आवश्यक ठरणार आहे.