डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष साक्षीदाराने दाभोलकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांना ओळखले आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर खुनाचा आरोप असून या दोघांना प्रत्यक्ष साक्षीदाराने न्यायालयात आळखले आहे. २० ऑगस्ट २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
पुणे:-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाला (Dr. Narendra Dabholkar Murder Case) कलाटणी देणारी महत्वाची माहिती पुढे आली आहे. दाभोळकर यांच्या खूनाचा आरोप ज्या आरोपींवर ठेवण्यात आला आहे ते, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. अंदुरे आणि कळस्कर या दोघांनी दाभोळकरांवर गोळीबार केला आणि त्यानंतर ते पळून गेले अशी साक्ष साक्षीदाराने दिली आहे. (eyewitness identified murderer of dr narendra dabholkar in court)
दाभोलकर खून प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या सनातन संस्थेशी संबंधित आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
२० ऑगस्ट २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी शिंदे पुलावर सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला (साक्षीदार) पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी जवळच्या एका झाडावर माकड आल्याने आवाज झाला. तसेच कावळ्यांचा आवाज देखील येऊ लागल्याने या दोघांनी त्या दिशेला पाहिले. त्याच वेळी एका व्यक्तीला (डॉ. नरेंद्र दाभोलकर) दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली कोसळली. त्यानंतर हे हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले आणि दुचाकीवरून पळून गेले.
या घटनेनंतर साक्षीदार जवळ गेले असता डॉ. दाभोलकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हे दृश्य पाहिल्यानंतर हे दोघे सफाई कर्मचारी आपल्या कामासाठी निघून गेले. यावेळी अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या असे या साक्षीदाराने न्यायालयाला माहिती देताना सांगितले. आता या प्रकणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे.