कारंजा (लाड): श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे निस्सिम स्वयंसेवक आणि भजनी मंडळे व लोककलावंताच्या न्याय्य हक्कासाठी प्रसंगी शासनासोबत संघर्ष करून त्यांना त्यांचे हक्काचे मानधन मिळवून देणारे तमाम महाराष्ट्रातील एकमेव असे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या लहान भावाचे स्व.उमेश मधुकरराव कडोळे यांचे मागील महिन्यात आकस्मिक निधन झाले.आणि ही वार्ता कारंजा शहरात येऊन धडकताच सर्वत्र कमालीची शोककळा पसरली. उमेश कडोळे यांच्या मृत्युने जो तो हळहळत होता.विशेष म्हणजे उमेश कडोळे हे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट डफवादक, उत्तम संबळवादक,खंजेरी वादक, गोंधळी लोककलेत नैप्युण्य प्राप्त असलेले गोंधळी लोककलावंत, शेकडो गोंधळी गीताच्या रचना करणारे साहित्यिक होते.सद्य स्थितीत ते दिवाणी व फौजदारी न्यायालय पातूर जि.वाशिम येथे वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत होते.न्यायालयात त्यांची तब्बल २५ वर्षाची सेवा झाली होती. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचे तर ते प्रामाणिक,शांतीप्रिय, हास्यमुख,विश्वासू आणि सुस्वभावी होते. म्हातारपणी म्हाताऱ्या आईचा आधारस्तंभ होते. संपूर्ण कुटुंबाची त्यांचेवर उमेद होती.सेवानिवृत्ती नंतर गोंधळी लोककला आणि गोंधळी समाजासाठी कार्य करण्याचे त्यांचे स्वप्न होते परंतु अचानक मृत्युने त्यांना गाठले. ही बातमी कळताच कारंजा तालुक्यातील सर्वच भजनी मंडळे,हरिपाठ मंडळे,भजनी कलावंत, लोककलावंत यांनी एकत्र येवून श्री गुरुदेव सेवाश्रम कारंजा येथील सभागृहात श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी हजारो माताभगीनी व बांधवांनी त्यांना श्रध्दासुमने अर्पण केली.